Srikanth Bolla Inspiring Story : अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी; सर्वांनी नक्की वाचा..,

Srikanth Bolla Inspiring Story

who is srikanth bolla know the inspiring real life story :- सर्वांना नमस्कार, तुम्ही राजकुमार राव अभिनित “श्रीकांत” हा चित्रपट पाहिलाय का? जर आतापर्यंत पाहिला नसेल, तर आमच्या मते एकदा नक्की बघावा. तुम्ही विचार करत असाल की, आम्ही अचानक चित्रपटाबद्दल का बोलायला लागलो? चित्रपटाचं प्रमोशन करतोय का? नाही, मग आम्ही राजकुमार राव यांचे चाहते आहोत का? तर नाही. हा चित्रपट तुम्ही या कारणासाठी बघितला पाहिजे की ही कथा ज्या “श्रीकांत” च्या जीवनावर आधारित आहे, ती तुमच्या-आमच्यासारख्या लाखो, करोडो लोकांना प्रेरणा देणारी आहे.

Srikanth Bolla Inspiring Story

तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला.

त्याने हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया. 

श्रीकांत बोल्ला याचा जन्मजात संघर्ष

श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं.

वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं  उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.

गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.

सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे.

ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.

श्रीकांतने शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात 

श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला  हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने  पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.

तरीही, त्याला  विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला.

त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि  विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा  पहिला  दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने  विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका

श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’

आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.

श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो  एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.

असा सुरु केला श्रीकांतने यशाचा प्रवास 

वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.

2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.

श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.

श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.

आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला. 

श्रीकांतला मिळालेले पुरस्कार आणि मानसन्मान 

श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.

त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली.

श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.

श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.

त्याचा कधीही तडजोड न करणारा स्वभाव आणि त्यांच्या सेंस ऑफ ह्यूमरने त्याला त्याच्या जीवनातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्याची ताकद दिली. त्याने कधीही स्वतःला दयेचे पात्र बनवले नाही, उलट त्या परिस्थितींवर हसून ते पुढे जात राहिला. त्याच्या या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते – जीवनातील कोणतेही संकट हे आपल्या आत्मबलापुढे थिटे आहे, फक्त आपल्याकडे त्याला सामोरे जाण्यासाठी धैर्य हवे. जीवनात कोणतीही अडचण आपल्याला तोडू शकत नाही, जर आपला स्वतःवर विश्वास असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top